आम्हाला वाटले चेष्टा करतोय; पण त्याने गोळ्या झाडल्या   

मुंबई : मुस्लिम असो की हिंदू.. दोनदा विचारल्यावर आम्हाला वाटले की तो माणूस  चेष्टा करतोय; पण काही सेकंदातच त्याने शुभमच्या डोक्यात गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली पडला, असे हल्ल्यात पती गमावलेल्या कानपूरच्या ईशान्या द्विवेदीने सांगितले. 
 
ईशान्या लग्नानंतर पहिल्यांदाच कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेली होती. मंगळवारी पहलगामच्या उंच भागावर घोडेस्वारी करून ते कुटुंब प्रवेशद्वारावर पोहोचले. इशान्याचे पती शुभम आणि बहीण शांभवी तिच्यापासून ५० मीटर अंतरावर एकत्र बसले होते. तर आई-वडील प्रवेशद्वाराजवळ होते. याचदरम्यान एका दहशतवाद्याने येऊन ईशान्याला विचारले की, तुम्ही हिंदू आहे की मुस्लिम? तुम्ही मुस्लिम असाल तर कलमा म्हणा. मात्र, तिला हे बोलणे विनोदी वाटले, त्यामुळे तिने नाही भाऊ, आम्ही मुस्लिम नाही, असे सांगितले. त्याचवेळी लष्कराच्या वेशातील दहशतवाद्याने तिचा पती शुभम याच्यावर गोळ्या झाडल्या.   
 
शुभमला गोळ्या घातल्यानंतर दहशतवाद्यांनी ईशान्याला सांगितले की, आम्ही तुला जिवंत सोडत आहोत, जेणेकरून तू जाऊन तुझ्यासोबत काय झाले ते तुझ्या सरकारला सांगता येईल. त्यानंतर दहशतवादी पळून गेले आणि तेथे चेंगराचेंगरी झाली.
 
‘माझ्या डोळ्यासमोर माझा नवरा गेला आणि मी काहीच करू शकले नाही. दहशतवाद्यांनी मलाही मारले असते; पण त्या घटनेनंतर माझी बहीण आणि  आई-वडिलांनी मला प्रवेशद्वाराबाहेर नेले. काही वेळातच लष्कराचे जवान तिथे आले. शुभमचा मृतदेह तिथेच पडून होता. मी रडत रडत त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते’, असे ईशान्याने सांगितले.  दरम्यान, शुभम द्विवेदी हा कानपूरमधील सिमेंट व्यापारी संजय द्विवेदी यांचा मुलगा आहे. तो पत्नी, वडील आणि ११ नातेवाईकांसह काश्मीरला पर्यटनासाठी गेला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. 
 

Related Articles